चिंतामणी त्र्यंबक खानोलकर (आरती प्रभू)

जन्म : ०८ मार्च १९३०
मृत्यु : २६ एप्रिल, १९७६
कार्यक्षेत्र : कवी, लेखक, नाटककार

चिंतामणी त्र्यंबक खानोलकर ऊर्फ आरती प्रभू ह्यांच्या मातोश्री कोकणातल्या एका गावी खानावळ चालवीत. तेथे बसून खानोलकर कविता करत. त्यांच्या खानावळीत जेवायला येणाऱ्या काही मंडळींनी त्यांच्या कवितेचे काही कागद चोरून त्या कविता “आरती प्रभू” या नावाने “मौज” मधे छापण्यास पाठवून दिल्या. ‘मौज’च्या अंकात आपल्या कविता प्रकाशित झाल्याचे बघून खानोलकर बावरून गेले. आणि त्याच अवस्थेतच त्यांनी कविता लिहिली…..
ये रे घना
ये रे घना
न्हाउं घाल
माझ्या मना …
त्यांना भीती होती की अचानक मिळालेल्या या प्रसिद्धीमुळे आपली प्रतिभा, आपल्याला मिळालेली शब्दांची ही देणगी आपल्या हातून निसटून तर जाणार नाही ना. पण तसे काही झाले नाही. त्यांच्या प्रतिभेचा सूर्य त्यांच्या अकाली निधनापर्यंत मराठी साहित्यसॄष्टीत तळपतच राहिला.