
जन्म : १० मे, १९३७
मृत्यु : २६ मार्च, २०१२
कार्यक्षेत्र : साहित्य, मराठीचे अध्यापन, विश्वकोश संपादक मंडळात समावेश
माणिक सीताराम गोडघाटे ऊर्फ कवी ग्रेस यांची गणना मर्ढेकरोत्तर नवकवींच्या दुसर्या पिढीतील प्रमुख कवींमध्ये होते.
“वार्याने हलते रान” ह्या त्यांच्या ललितलेखसंग्रहासाठी त्यांना २०१२ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार देण्यात आला होता. त्यांचे पाच काव्यसंग्रह आणि सात ललितलेखसंग्रह आजवर प्रकाशित झाले आहेत.
इ.स. १९६६ ते १९६८ या काळात नागपूरच्या धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये अधिव्याख्याता म्हणून त्यांनी काम केले. इ.स. १९६८ पासून ते नागपूरच्याच वसंतराव नाईक समाजविज्ञान संस्थेत (मॉरिस कॉलेज) मराठीचे अध्यापन करू लागले. प्राध्यापक म्हणून १९९७ मध्ये ते सेवानिवृत्त झाले. त्यानंतर २००४ पर्यंत नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठात मराठी विभागात व ललित कला विभागात संशोधन मार्गदर्शक म्हणून कार्यरत होते. ‘सौंदर्यशास्त्र’ या विषयाचे अध्यापनही या विद्यापीठात त्यांनी केले. इ.स. १९७१ ते १९७६ या काळात दिल्लीच्या भारतीय साहित्य अकादमीच्या मराठी सल्लागार समितीचे ते सदस्य होते. महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे १९८२ ते १९८६ या काळात ते सदस्य होते.
‘ग्रेस’ या नावाविषयी……..
इ.स. १९५८ पासून माणिक गोडघाटे यांनी काव्यलेखनास प्रारंभ केला. इन्ग्रिड बर्गमन या पाश्चात्य अभिनेत्रीच्या अभिनयाने प्रभावित होऊन गोडघाट्यांनी “ग्रेस” हे साहित्यिक नाव धारण केले. ”दी इन ऑफ द सिक्स्थ हॅपिनेस” या बोलपटात इन्ग्रिडसंबंधी “शी इज इन ग्रेस” असे वाक्य येते. हा बोलपट पाहत असताना तिने आपल्याला शीळ घातलेली आहे, असे गोडघाट्यांना वाटले. त्या लहरीने आपल्या आत्म्यावरची धूळ उडाली आणि प्रतिभा-रूपाचा पहिला साक्षात्कार आपल्याला इन्ग्रिडमध्ये झाला; तिचे ऋण आठवीत राहण्यासाठी आपण ग्रेस हे नाव धारण केले, असे गोडघाट्यांनी अक्षयकुमार काळे यांना दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले आहे.