
जन्म : २ फेब्रुवारी, १९५७
कार्यक्षेत्र : कवयित्री
महाराष्ट्रातील अग्रगण्य स्त्री लेखिकांसोबत नाव घेतलं जातं ते अरुणा ढेरे यांचं. बालपणापासून एका उच्च दर्जाच्या वाङ्मयीन वातावरणातच त्या मोठ्या झाल्या. अरुणा ताई ढेरेंच्या घरात जमिनीपासून छतापर्यंत रचलेल्या पुस्तकांमुळे ग्रंथांच्या सहवासात आणि साहित्याने भारावलेल्या वातावरणात त्यांचे बालपण गेले.
अरुणा ढेरे यांचा जन्म २ फेब्रुवारी १९५७ साली पुणे येथे झाला. त्यांचे एम.ए. पी.एचडी. पर्यंतचे सर्व शिक्षण पुणे येथे झाले. साहित्य अकादमी पारितोषिक विजेते, भारतीय संस्कृती, प्राचीन साहित्य इत्यादींचे व्यासंग असलेले ज्येष्ठ साहित्यिक रा. चिं. ढेरे यांच्या अरुणा ढेरे ह्या कन्या.
अरुणाताईंनी आजपर्यंत कथा, कादंबरी, ललित लेख, संशोधनपर लेख, आस्वादक समीक्षा इ. विविध विषयांवर विपुल लेखन केले असले तरी त्यांच्या अंतरीचा गाभा मात्र कवयित्रीचा आहे.
सहा कवितासंग्रह, तीन कादंबरिका, सहा कथासंग्रह, अकरा ललित लेखसंग्रह आणि समीक्षात्मक पुस्तक असे विविधांगी लेखन करणार्या डॉ. ढेरे या गेल्या काही दशकांतील अशा प्रकारच्या कदाचित एकमेव लेखिका म्हणता येतील.