ग. दि. माडगूळकर (गदिमा)

जन्म : १ ऑक्टोबर, १९१९
मृत्यु : १४ डिसेंबर, १९७७
कार्यक्षेत्र : साहित्य, चित्रपट

ग.दि. माडगूळकर हे आधुनिक काळतील मराठी भाषेतील अग्रगण्य साहित्यिक होते.

ग.दि.माडगूळकर हे गद्य व पद्य दोन्ही क्षेत्रात प्रसिद्ध आहेत. संत कवी नसले तरी त्यांचे गीत रामायण फार लोकप्रिय आहे. त्यांच्या गीत रामायणाने अखिल महाराष्ट्राला वेड लावले आहे.

नवयुग चित्रपट लि. ह्या चित्रसंस्थेत के. नारायण काळे ह्यांच्या हाताखाली साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करताना चित्रकथेची चित्रणप्रत कशी तयार करतात, हे त्यांना अगदी जवळून पहावयास मिळाले. तसेच आचार्य अत्रे ह्यांच्या सोप्या पण प्रासादिक गीतरचनेचा आदर्श त्यांच्या समोर राहिला. पुढे नवहंस पिक्चर्सच्या “भक्त दामाजी” (१९४२) आणि “पहिला पाळणा” (१९४२) ह्या चित्रपटांची गीते लिहिण्याची संधी मिळाली. पुढे राजकमल पिक्चर्सच्या “लोकशाहीर रामजोशी” (१९४७) ह्या चित्रपटाची कथा-संवाद आणि गीते त्यांनी लिहीली; त्यात एक भूमिकाही केली. ह्या चित्रपटाला फार मोठी लोकप्रियता लाभली.

त्यानंतर कवी आणि लेखक अशा दोन्ही नात्यांनी माडगूळकर हे मराठी चित्रसृष्टीचा एक भक्कम आधार बनले. गीतकार, कथासंवादकार आणि अभिनेते म्हणून दीडशेहून अधिक मराठी आणि कथासंवादकार म्हणून पंधरा हिंदी चित्रपटांसाठी त्यांनी काम केले.

त्यांच्या जोगिया, मंतरलेले दिवस, चैत्रबन इ. अनेक पुस्तकांना महाराष्ट्र शासनाची पारितोषिके मिळाली. भारत सरकारने पद्मश्री देऊन (१९६९) त्यांचा सन्मान केला. १९७३ मध्ये यवतमाळ येथे भरलेल्या मराठी साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपद त्यांना देण्यात आले होते. महाराष्ट्र राज्याच्या विधानपरिषदेचे ते काही काळ नियुक्त सदस्य होते; तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृति मंडळाचेही ते सदस्य होते.