आजकाल शिक्षणाच्या बाबतीत जे वाक्य सर्रास ऐकवयास मिळते ते म्हणजे, “आजकाल शिक्षणाचा नुसता बाजार मांडलाय“. असेलही, पण हा बाजार कोणी आणि कोणासाठी मांडलाय? आता अनेकजण म्हणतील की, शाळांनी. हो हेही मान्य! पण, या बाजाराला मान्यता कशी मिळाली? प्रोत्साहन कोणी दिले? हा बाजार फोफवण्यास मदत कोणी केली? याचे उत्तर म्हणजे “पालक”. मग याचा दोष शाळांवर का टाकून कसा चालेल? शाळांचा गुन्हा इतकाच की, त्यांनी या बाजाराची सुरवात केली…. केली म्हणण्यापेक्षा “प्रयत्न केला” असे म्हणणे योग्य होईल. कारण, अर्थशास्त्रात एक नियम आहे “मागणी तसा पुरवठा”. ज्या गोष्टीला मागणी असते त्याचा आणि फक्त त्याचाच पुरवठा होऊ शकतो. मागणीच नसेल तर पुरवठा कसा होईल? आज शिक्षणाच्याबाबतीत नेमके हेच झाले आहे, आपण मागण्या वाढवत चाललो आहे आणि शिक्षणास व्यावसायिक रूप मिळत चालले आहे.
सध्या आपली शिक्षण पद्धती एका विशिष्ठ अभ्यासक्रमावर आधारित आहे आणि त्यातही आपण आपले लक्ष केंद्रित केले आहे ते त्यातील गुणस्पर्धेवर. गुण म्हणजे सर्वकाही त्या एकाच संकल्पनेला आपण प्राधान्य देत आहोत. मग ते शिक्षण त्या विद्यार्थ्याच्या व्यक्तिकौशल्यास अनुरूप असो वा नसो. सध्याचे उदाहरण घ्या ना! जेव्हा एखादा पालक आपल्या पाल्यास शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी शाळेची निवड करत असतो तेव्हा तो फक्त खालील बाबी ध्यानात घेत असतो.
– त्या शाळेचे किती विद्यार्थी मेरिट मध्ये येतात?
– शाळेची गुणवत्ता यादीतील टक्केवारी किती आहे?
– अभ्यासकराम किती शिकवला जातो, परिक्षा किती वेळा घेतात?
पण, कधी हे विचारले आहे काय? की, माझ्या मुलाच्या अंगी असलेल्या गुणांचा विकास करण्यासाठी शाळेचे प्रयत्न काय असणार आहेत? कधीच नाही. कारण सरळ आहे, आपण आपल्या पाल्याला गुणार्जन करण्यासाठीच शाळेत पाठवतो, फक्त “गुणार्जन”. आपल्याला शिक्षण आणि ज्ञान या मूळ संकल्पनेचा अर्थच माहीत नाही, अथवा जाणूनबुजून त्याकडे दुर्लक्ष. शाळेत सुद्धा मुलांना काय शिकवले जाते? तर अधिकाधिक गुण कसे मिळवावेत. जर गुण मिळवून अव्वल क्रमांक नाही पटकावला तर या जगात टिकून नाही राहू शकत. त्यांना आपण ज्ञानार्जन या संकल्पनेचा अर्थ समजूच देत नाही. प्रत्येक विषयाला आपण एक मर्यादा घातल्या आहेत, त्यामुळे त्या विद्यार्थ्याला कितीही रस असला तरी एका टप्यानंतर त्याला एखाद्या विषयाचे सखोल ज्ञान मिळवण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. एखाद्यावेळी एखादी अडचण शिक्षकाला विचारालीच तर ९५% शिक्षक त्याला हेच म्हणतील की, “परीक्षा जवळ आली आहे, त्याचा अभ्यास कर आधी. नंतर ह्या सगळ्या गोष्टी”. कारण काय तर, शिक्षण पद्धतीत गुणप्रक्रियेला दिलेले अवास्तव महत्व. ज्ञान मिळवण्यासाठी विद्यार्थ्याला व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आपली शिक्षणपद्धती कुठेतरी कमी पडतेय असे नाही वाटत तुम्हाला?
सध्या गरज आहे एका परिवर्तनाची, आपल्या शिक्षणपद्धतीत बदल आणण्याची. सध्याच्या प्रणालीत अशी लवचिकता आणली पाहिजे जेणेकरून प्रत्येक विद्ध्यार्थी स्वत:च्या आवडीच्या विषयाचे ज्ञान मिळवू शकेल. हा बदल घडवण्यासाठी आपल्याला निसर्गाकडून शिकण्यासारखे बरेच काही आहे. मनुष्याला भेडसावणा-या बहुतेक सर्वच प्रश्नांची उत्तरे आहेत. निसर्गाने प्रत्येक घटकांसाठी वेगवेगळे नियम बनवले आहेत, प्रत्येकाला स्वतःची अशी ओळख दिली आहे. जसा वाघ आपल्या बछड्याना सर्व प्रकारचे शिक्षण देतो पण शिकार कशी करावी याचे सखोल ज्ञान देतो. सुगरण पक्ष्याचे उदाहरण घ्या, सुंदर खोपा कसा विणावा हे तोच जाणू शकतो. प्रत्येकाने आपापली शिक्षणपद्धती अवलंबली आहे, तेच जर सरसकट शिक्षण पद्धती असती तर?
आजच्या या शिक्षणपद्धतीत विद्यार्थ्याला काय काय झेलावे लागत आहे हे त्याचे त्यालाच माहीत. सकाळी शाळा, दुपारी खाजगी शिकवणी, नंतर ज्याला आपण “Extra Curricular Activity” म्हणतो त्या गोष्टी म्हणजे; ड्रॉईंग-पेण्टिंग / अॅबॅकस / कराटे आणि खूप काही…. चला, या गोष्टी मुलांच्या कौशल्याअनुरूप असल्या असत्या तरी एकवेळ त्या मान्य करता आल्या असत्या. पण ९९% या सगळ्या गोष्टी पालकांच्या मर्जीवर अवलंबून असतात. त्यांना जसे वाटते त्यानुसार मुलगा शिक्षण घेत असतो. अरे पण त्या छोट्याश्या मेंदूवर किती परिणाम होत असेल, याचा कधी विचार केलाय? अरे, साध्या किचनमधल्या १लिटरच्या बाटलीत सुद्धा तेल ओतताना आपण १लिटरच तेल ओततो. नवीन गाडी घेतल्यावर ठराविक किलोमीटर पर्यंत मर्यादित वेगाने गाडी चालवणारे आपण या निष्पाप मुलांच्या मेंदूसोबत किती खेळ खेळतो? जरा स्वतःची जबाबदारी ओळखायला शिका…. पालक व शिक्षक….यांना हात जोडून एक प्रश्न विचारावसा वाटत आहे कि, त्या लहानग्यांच्या मेंदूत इतक्या गोष्टी भरण्याचा अट्टाहास कशाला? त्याला ज्ञान देताना जरा त्याच्या कलागुणांना वाव कसा मिळेल हे जरा ध्यानात घ्याना. त्याच्या आवडीच्या विषयात त्याला सुरुवातीपासूनच प्रावीण्य मिळवू द्याना.
कदाचित तुम्ही सर्वांनी ऐकले असेल, पूर्वीच्या काळात “गुरुकुल” असायचे. सर्व विद्यार्थी एकत्र शिकयचे पण त्यातला प्रत्येकजण आपापल्या विषयात पारंगत असायचा. त्यावेळचे गुरुसुद्धा विद्यार्थ्याच्या कलागुणांना वाव द्यायचे. त्यामुळेच एकाच ठिकाणी शिक्षण होऊनसूद्धा अर्जुनाने धनुर्वद्येत प्रावीण्य मिळवले होते तर युधिष्ठीर धर्मशास्त्रात पारंगात होता. भीम आणि दुर्योधन मुष्ठीयुद्धात तरबेज होते. हे कशामुळे शक्य झाले, कारण गुरू द्रोणाचार्यांनी प्रत्येकाच्या कौशल्यानुसार त्यांना त्या त्या विषयाचे ज्ञान दिले. याच पद्धतीची शिक्षण प्रणाली आता सुद्धा ग्रहण केली पाहीज, जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याच्या कौशल्याला वाव मिळेल. जेव्हा प्रत्येक विद्यार्थ्याचा व्यक्तिगत विकास होईल आणि एक सशक्त पिढी तयार होईल. जेणेकरून समाजाचा आणि पर्यायाने देशाचा विकास होईल.