
जन्म : १० मार्च, १९२९
मृत्यु : ३० डिसेंबर, २०१५
कार्यक्षेत्र : साहित्यिक, अध्यापक
पाडगांवकरांचा जन्म वेंगुर्ला, (सिंधुदुर्ग जिल्हा, महाराष्ट्र) येथे झाला.
त्यांनी मुंबई विद्यापीठातून मराठी व संस्कृत या भाषाविषयांत एम.ए. केले. ते काही काळ मुंबईच्या रुईया महाविद्यालयात मराठी भाषाविषय शिकवत होते. पाडगावकरांचे ‘धारानृत्य’, ‘जिप्सी’, ‘सलाम’, ‘तुझे गीत गाण्यासाठी’ हे काव्यसंग्रह विशेष प्रसिद्ध आहेत.
काव्यवाचनासाठी महाराष्ट्राचा दौरा करणारे कवी तर अतिशय विरळा. मंगेश पाडगावकर हे असे विरळा कवींपैकी होते.
वसंत बापट, मंगेश पाडगावकर आणि विंदा करंदीकर यांच्या काव्यवाचनाची भूल मराठी मनाला अशी पडली होती की, ज्या गावात त्यांच्या काव्यवाचनाचा कार्यक्रम असे, तिथे रसिक जथ्थ्या- जथ्थ्याने येत. काव्यरसिकांवर गारुड करणारी एक अजब बेहोषी या तिघांच्या काव्यवाचनात असायची. १९५० ते १९९० अशी तब्बल चार दशके या तिघांच्या काव्यवाचनाची मोहिनी कायम होती.
इ.स. १९९०च्या दशकानंतर मात्र उतारवयामुळे तिघांनीही कार्यक्रम कमी केले आणि नंतर या त्रयीतले एकेक जण गळायला लागले. आधी वसंत बापट गेले, नंतर विंदांनी निरोप घेतला आणि शेवटी ‘या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे’ म्हणणारे मंगेश पाडगावकरही गेले. मात्र बापट-पाडगावकर-करंदीकर कुणीही नसलं, तरी त्यांनी रुजवलेली काव्यवाचनाची गोडी मात्र मराठी मनांमनांत झिरपली आहे.