नदीच्या तीरावर

कवी : कुसुमाग्रज


गावाबाहेरच्या निर्जनात नदीच्या तीरावर
लव्हाळे भरलेल्या खडकावर बसून
तो पाहत होता अविचल
सायंकालीन सावल्यांत
मालवणा-या प्रवाहाकडे
सूर्यास्ताचे स्मरण
काळजात ठेवणा-या ढगाकडे
हरवला होता तो
पंखातून गळलेल्या पिसासारखा
असंबंधित…
मी विचारले
तू कोण आहेस?
तो हसून उत्तरला…
मी तूच आहे!

आपण अविभक्त
तरीही
(तुजमजमध्ये परी केवढी ही दरी)
आपण दुभंगलो आहोत
अपार-अजिंक्य अंतराने
तू तुझ्या वाटेने जा
क्षितिजावरल्या दिव्यांच्या त्या रोषणाईकडे
संमर्द,संस्मिताकडे,चक्राच्या गतीकडे

मी…
येथेच बसून राहणार आहे
या खडकावर
कालातीत.

Leave a Comment