तुमचे हार पोचले
जयघोष पोचले
कल्पनेतही नसलेले
लष्करी कुर्निसातही पोचले.
फासावर चढताना
संसार जळताना
रक्त सांडताना
आमचे एक स्वप्न होते.
रंकांच्या माथ्यावरील छपरचे
उघड्या अंगावरील वस्त्रांचे
उपाशी पोटातील अन्नाचे,
स्वातंत्र्याच्या सफलतेचे.
घोष विरल्यावर, दिवे विझल्यावर
मध्यरात्रीच्या निवांतात
गिधाडांचे थवे आले
त्या स्वप्नाचे तुकडे चोचीत घेऊन – तेही पोचले.