आयुष्याच्या अंगठी मधील आठवणींच्या कोंदणात जर कोणाला बसवायचे असेल तर ती व्यक्ती सुद्धा हिऱ्यासारखी मौल्यवान असावी लागते.
त्या व्यक्तीशी जुळलेले आपले ऋणानुबंध म्हणजे हिऱ्याला पाडलेले पैलू. हे पैलू जितके उत्कृष्ठ असतील तितकीच त्या हिऱ्याची (नात्याची) किंमत वाढत जात असते.
आणि दोघांच्या नात्यामधील विश्वासार्हता म्हणजे त्या कोंदणाची घट्ट पकड. आणि तीच सगळ्याच महत्वाची…..
जेवढे ऋणानुबंध आणि विश्वासार्हता यांची सांगड जेवढी योग्य तेवढीच कोंदणाची हिऱ्यावरची पकड घट्ट होत जाते.
आणि जस जशी दोघांच्या नात्यामधील विश्वासार्हता सैल पडत जाते तसं तसं सगळंच बिनसत जातं, आणि हळू हळू तो हिरा कोंदणातून कधी निखळून पडतो तेच नाही कळत.
हिरा त्या कोंदणातून निसटून स्वतंत्र होतो पण, रिकामी झालेल्या त्या कोंदणाचे रितेपण त्याचे त्यालाच ठाऊक.
पुढेमागे त्या हिऱ्याला दुसरे एखादे कोंदण सापडेलही, ते नवीन कोंदण त्याला आपल्यात सामावून घेईलही. पण रिकामी झालेल्या कोंदणाच्या रितेपण भरायला दुसरा तसाच हिरा सापडणे मात्र दुर्मिळ …..
नाही ….. माफ करा….. ते कधीच शक्यच नसते….
मग त्या नवीन हिऱ्याला आपल्यात सामावून घेण्यासाठी त्या कोंदणाला परत अग्निपरीक्षेतून जावे लागते. शेकडो घणांचे घाव अंगावर झेलावे लागतात आणि त्या हिऱ्याच्या पैलूंप्रमाणे परत स्वतःला नव्याने घडवावे लागते.
या सगळ्यामध्ये त्या कोंदणाचे मूळ स्वरूप हळू हळू नष्ट झालेले असते …. आणि कालानुरुप ते कोणाच्याही लक्षात राहतही नाही…… पण कोंदण मात्र असंख्य घाव झेलून मनाच्या तळाशी हीच प्रार्थना करत असतो कि, हि पकड तरी कायमस्वरूपी असावी.