भ्रष्टाचार आणि देव

भ्रष्टाचार म्हणजे काय ?

एखादे काम करण्यासाठी त्याबदल्यात अवैध्यरित्या मोबदला घेणे. बरोबर ना ???

मग जर हाच नियम लागू असेल तर… जगातील सगळ्यात भ्रष्टाचारी व्यक्तिमत्व कोण माहिती आहे ? देव….. हो हो बरोबर वाचलत, देव…..

जसा सरकारी बाबू लाच घेतल्याशिवाय काम करत नाही तसा देव सुद्धा नवस आणि उपास-तापास केल्याशिवाय ईच्छित फळ देत नाही. अविवाहितांनी ११ सोमवार केले तरच योग्य असे स्थळ भेटेल…. २१ गुरुवार करा, अनिष्ठ दूर होतील…. मंगळवारी सिद्धीविनायकला पायी चालत गेलात तर नोकरी-धंद्यात यश मिळेल….. अन्यथा कोप होईल. या सर्व प्रकारांना काय म्हणायचे ? भक्ती की भ्रष्टाचार ? आणि लोक म्हणतात की, देव कुणाचे वाईट चिंतत नाही. मग ११ सोमवार किंवा २१ गुरुवार नाही केले तर देवाचा कोप होईल ? तो माझे वाईट करेल. का? इतक्या छोट्या मनाचा आहे तो? खूप लोक मला बोलतात की तू नास्तिक आहेस, देवावर माझा विश्वास नाही. त्या लोकांना मी सांगू ईच्छितो की मी देवाला मानतो, पण फक्त देवाला…..त्याच्या नावाने चाललेल्या व्यावसायिक्तेला नाही.

शेवटी देव म्हणजे काय हो ? एक अनामिक शक्ती… सकारात्मक विचारांचे मूर्त स्वरुप. देव आणि माझे नाते हे आमच्या दोघांमधील आहे, इतरांनी त्यामध्ये ढवळाढवळ करू नये. ज्याप्रमाणे तुम्ही व्यक्‍तिगत आयुष्यात दोन व्यक्तींमधील नात्यातमध्ये तिस-या व्यक्तीला ढवळाढवळ करू देत नाही त्याचप्रमाणे देव आणि तुमच्या मधील नात्याला तुम्ही तुमच्या दोघांमध्ये का ठेऊ शकत नाही, त्याचे प्रदर्शन का मांडता ?

एखादी व्यक्ती पटाईत पोहणारी असते आणि ती पूर्ण भरास आलेल्या नदिमध्ये बिन्दिक्कत उडी मारते. मला सांगा ते पाहून, तुम्हाला जेमतेम पोहाता येत असेल तरी तुम्हीसुद्धा उडी मारता ? नाही ना…. मग इतर करत करत असलेल्या धार्मिक विधींचा अर्थ समजावून न घेता तुम्ही त्यांचे कसे अनुकरण करू शकता ? ज्याप्रमाणे प्रत्येक रोगाचे औषध वेगवेगळी असतात त्याचप्रमाणे प्रत्येक विधीचा उद्देश आणि त्याची पार्श्वभूमी वेगवेगळी असते, ती प्रथम समजावून घेतली पाहिजे. कोणीतरी सांगतो आणि तुम्ही सुरू करता… याला काही अर्थ आहे का? देव तुमच्याकडून निस्वार्थ आणि निर्मल मनाने होणार्‍या भक्तीची अपेक्षा करतो आणि ना की आर्थिक व्यवहाराची…. घरच्या गाभार्‍यात बसलेला गणपती आणि सिद्धीविनायक मंदिरात असलेला गणपती हा वेगवेगळा आहे का? आणि सांगा ना की, १० तोळे सोने घेऊन लालबागचा राजा काय करणार आहे? मारुती गाडी घेऊन तो कुठे फिरायला जाणार आहे ? हाच पैसा जर उचित कार्यासाठी वापरला गेला तर काय देवाचा कोप होणार आहे?

आता हे खूपच लांबट होत आहे …. तेव्हा तूर्तास पुरे…. पण विचार करा जरा….

Leave a Comment