धर्म म्हणजे काय?

धर्म म्हणजे काय? खरं म्हणायचे झाले तर याचा खरा अर्थ मला सुद्धा अजुनपर्यंत कळलेला नाही. एकाच धर्माच्या अनेक लोकांना मी यासंदर्भात प्रश्न विचारले, उत्तरेही मिळाली…. पण ती माझ्यादृष्टीने पुरती समाधानकारक नव्हती. एकाच प्रश्नाचे उत्तर प्रत्येकाने प्रत्येकाच्या कुवतीनुसार वेगवेगळे दिल्यामुळे माझ्यातरी मनामध्ये संभ्रम तयार झाला आहे.

असे का झाले ? धर्म एक… पण त्याची विचारसरणी प्रत्येक व्यक्तीच्या कुवतीनुसार बदललेली.

असे होण्याचे कारण काय? कारण म्हणावे तर एकाच, सारासार अन् सद्सद बुद्धीने विचार न करता, तथाकथित लोक ज्याप्रमाणे सांगतील त्याप्रमाणे केवळ अनुसरण करतात. अरे पण, ते जे सांगत आहेत त्याचा संदर्भ तपासण्याची तुम्ही कधी तसदी घेतली आहे काय? जरा स्वत: त्याबदद्ल कधी अभ्यास करण्याचा प्रयत्न केला आहे काय? अरे साधा मोबाईल किंवा टि. व्ही. घेताना “Market Research” च्या नावाखाली दहा ठिकाणी चौकशी करता, मग एवढ्या मोठ्या विषयाबाबत इतकी उदासीनता का? जवळील परिचीत व्यक्तीशिवाय इतर कोणी सांगितले तरी छोटासा मोबाईलही न घेणारे आम्ही, धर्माच्या नावाखालील चिथावणीला बळी पडतो?

आता असे समजू नका की मी धर्माला मानत नाही, मी त्याच्या विरुद्ध आहे. मलासुद्धा माझ्या धर्माबद्दल तितकाच अभिमान आहे जेवढा तुम्हाला. समाजाला सुदृढ आणि सामर्थ्यवान बनवण्यात धर्माचा जितका सहभाग असू शकतो तितका नक्कीच कुणाचा असू शकत नाही. समाजाची जडण-घडणीमध्ये सुद्धा धर्माचा अतिशय महत्वाची भूमिका असते. पण हे सर्व होण्यासाठी समाजातील प्रत्येक व्यक्तिने स्वत:च्या धर्माचा नेमका अर्थ समजावून घेतला पाहिजे, अन्यथा अर्थाचा अनर्थ होण्यास वेळ लागत नाही. आणि हे सर्व शक्य होईल अभ्यासाने, संशोधनाने.

माझ्यामते प्रत्येक धर्माची स्थापना ही एका विशिष्ठ काळात आणि विशिष्ठ परीस्थीत झाली असणार आणि तत्कालीन परिस्थितीनुसार त्याची विचारधारा निश्चित केलेली असणार. पण येथे एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे, त्यावेळेसही भविष्यातील बदलांचा विचार केला गेला होता आणि त्यामुळेच आजवर या वैज्ञानिक युगापार्यंत त्या संदर्भाचा प्रमाण म्हणून विचार करू शकत होतो. पण, अजुन किती दिवस त्याच कालबाह्य संदर्भांनाच प्रमाण मानणार आहोत. कारण काळानुसार संदर्भ बदलत असतात. हेच बदललेले संदर्भ शोधण्यासाठी संशोधनाची गरज आहे. या विषयातले संशोधन हीच आजच्या काळाची गरज आहे. सर्वच विषयांत संशोधन होतच असते, त्याचप्रमाणे याही विषयात होत असेल, पण ते सर्वांसमोर येत नाही आहे, किंबहुना काही घटक स्वार्थासाठी येऊ देत नसतील. त्यामुळे सद्ध्या प्रत्येकाने याबाबतीत पुढाकार घेण्याची गरज आहे. धर्माच्या मूलभूत नियमांना धक्का लावण्याची गरज नाही, कारण हे नियम ठरवताना प्राचीन काळीच सर्व गोष्टींचा विचार केला गेला आहे. आपल्याला फक्त त्या नियमांना आजच्या परिस्थितीनुसार नवीन साच्यात घडवण्याची गरज आहे.

एक लक्षात घ्या की, प्रत्येक धर्माला एक समृद्ध असा वारसा आहे, एक शालिन अशी विचारधारा आहे. ज्याप्रमाणे प्रत्येक समाजात समृद्ध अश्या विचारसरणीचे लोक असतात त्याचबरोबर स्वत:च्या फायद्यासाठी धर्माचा वापर करणारा एक घटकही असतो, फक्त हे लक्षात ठेऊन धर्माचरण करण्याची गरज आहे. या गोष्टीचे ज्यावेळेस सर्वांना नीट आकलन होईल त्यावेळेस समाजात ऐक्य विनासायास निर्माण होईल.

Leave a Comment