फुगा

कवयित्री : अरुणा ढेरे


रस्त्याच्या वळणावर तुला
अचानक दिसतो एक फुगेवाला

माझं बोट सोडून तू नाचू लागतेस
विसरतेस नुकता खरचटलेला गुडगा
मळलेला नवा झगा
तुझा आक्रोश परिवर्तीत होत होत
बनतो एक हर्षभरा जल्लोष
तू टाळ्या पिटतेस, भान विसरतेस

तुझ्या डोळ्यांना आता
हवेत डोलणारे फुगेच फुगे रंगीबेरंगी
ला, पिवळे, हिरवे, नारंगी
आता तुला फक्त एकाच ध्यास
फुगा हातात धरण्याचा,
आपला म्हणून मिरवण्याचा
अन्‌ मग हलके हलके ढगांमधून
त्याला परीराणीच्या राज्यात धाडून देण्याचा

तुझ्या हातात हवा भरलेला
रंगीत फुगा भलाथोरला
आणि तुझा चेहरा हसरा, फुलारलेला
जणू मीच माझ्याकडे पाहते आहे खरोखर
माझ्या हातात एक शब्द, रंगीत, सुंदर

Leave a Comment