शिदोरी

“जे होते ते चांगल्या साठीच असे समजायचे, तिची स्वप्नं खूप मोठी आहेत “. पाठमोऱ्या वळलेल्या तिच्याकडे बघून तो स्वतःलाच समजावू लागला,

आज कित्येक वर्षांनी ती त्याच्या समोर आली दोघांच्या वयात, वागण्यात, बोलण्यात एकप्रकारची maturity होती, “माझ्याही मनात होतास तू, त्या वेळी तू मला का नाही विचारलेस ?, त्या वेळी सांगितले असतंस तर आज आपण एकत्र असतो” ती म्हणाली.

काळजात धस्स करणारं तिचं ते वाक्य त्याच्या मनावर खूप मोठा परिणाम करून गेलं, आयुष्यात आपण अजून काय गमावलंय ह्याची त्याला कल्पनाही करवेना, तिच्याही ह्या प्रेमाच्या कबुलीचा त्याच्या आयुष्यात उशिरा आलेला हा आनंद सोबत दुःखाचं वलय घेऊन आला होता. एकमेकांशी गप्पा मारताना त्याला ती हळू हळू उमगू लागली, ती आधी पासूनच अशी होती कि ती आत्ता बदललीय त्याला तिचा अंदाज लागेना, आज तो तिला खऱ्या अर्थाने समजण्याचा प्रयत्न करत होता, दोघांच्याही विचारांत परिपक्वता होती, दोघेही आपापल्या क्षेत्रात निपुण होते, फक्त दोघांचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता. वागण्या बोलण्यातला खंबीरपणा आत्मविश्वास तिच्या कर्तृत्वाची आणि तिने अनुभवलेल्या संसारातल्या कडू गोड अनुभवांची साक्ष देत होता, एकमेकांचा निरोप घेत दोघे वेगवेगळ्या दिशेने निघाले आयुष्याच्या पुढच्या प्रवासाला …..

“जे होते ते चांगल्या साठीच असे समजायचे, तिची स्वप्नं खूप मोठी आहेत, कदाचित माझ्यासोबत तिला तिचे हे जगत असलेले आयुष्य मिळाले नसते ” ….. पाठमोऱ्या वळलेल्या तिच्याकडे बघून तो स्वतःलाच समजावू लागला.
“कदाचित आमचे पटले नसते, किंवा पटलेही असते तर adjustment कराव्या लागल्या असत्या, तिलाही आणि मलाही.”
काय चांगले काय वाईट हे खरंच त्या देवालाच माहित …..

त्याच्या विचारांचं चक्र चालू झालं, “आगीतून फोफाट्यात” अशी म्हण आहे आपल्याकडे, किंवा ‘आस्मान से टपके और खजूर में अटके ‘ असंच काहीसं एकातून बाहेर पडतो ना पडतो दुसरी जखम तयार …..” मग ते प्रेम असो किंवा अजून काही …. पण adjustment करून आवडीच्या व्यक्ती सोबत आयुष्य घालवण्यात हि एक वेगळंच समाधान असते, मुळात काय तर आनंदी राहता आले पाहिजे कि सुख आपोआप सापडत जातं ….

मन कासावीस झालेलं असतानाही, चेहऱ्यावर मंद स्मित हास्य घेऊन चालता चालता, अश्याच एका कठीण प्रसंगी आज्जीने दिलेली विचारांच्या शिकवणीची शिदोरी त्याने उघडली …..
“आपल्यापेक्षा वाईट दिवस जगणाऱ्यांकडे बघून, आपल्याला दिलेल्या सुखाबद्दल, आई -बापाचे आणि देवाचे आभार मानत जगायचं, म्हणजे आयुष्याच्या प्रवासात शिणवा जाणवणार नाही “

— मी नसे गुलजार (शारद)

Leave a Comment