लिहिल्याशिवाय रहावले नाहि म्हणून लिहितोय……………
जे सुज्ञवाचक शनिवारी (२६ सप्टेंबर २०१५) रात्री लालबागला गेले असतील त्यांना नक्किच कळेल मी काय आणि कश्याबद्दल बोलतोय ते….
प्रसंग पहिला……………..
जवळपास ११-११:३० झाले होते, “लालबागच्या राजा” चे दर्शन १२ वाजता बंद होणार होते, त्यामुळे सगळयांची घाई झालेली दर्शन घेण्याची. आम्हीपण घुसलो त्या गर्दिमध्ये…. त्यावेळी, अक्षरश: दोन भिन्न टोकाचे अनुभव आले मला.
एकिकडे…….. कार्यकर्ते आणि स्वयंसेवक (येथे मी सर्वच्या सर्व कार्यकर्त्यांविषयी नाही बोलत आहे, त्यातील काहींची वागणूक चांगलीच होती) भक्तांना जी वागणूक देत होते ती अतिशय वाईट पद्धतीची होती. माझ्या समोरील एक उदाहरण घ्या… एक बाई त्या गर्दीमुळे गोंधळून गेली होती (बहुतेक तिच्याबरोबरील मंडळीशी तिची चुकामुक झाली होती), तिला कळत नव्हते कि नक्की कुठे जायचे आहे? त्यामुळे ती एकाच जागी थांबली होती. त्यावेळेस एक कार्यकर्ता तिच्यावर असाकाही ओरडला कि, जणु काहि तिने कुठला तरी अक्षम्य गुन्हाच केला (नशीब कि कुठल्या शिव्या नाही दिल्यात)… तिचे नशिब चांगले म्हणून नेमका एक पोलिस कॉन्टेबल तेथे आली आणि तिला बाहेर पडण्याचा मार्ग दाखवला.
आता तुम्ही म्हणाल की, एवढी गर्दी असते तेव्हा असे होणारच. अरे मग लालबागच्या राजाचे एवढं मार्केटींग का केलेत ? गर्दी खेचण्यासाठीच ना ? आणि तेथे असणारे मुंबई पोलिस तुमच्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने गर्दी नियंत्रित करत होते, जरा शिका काहीतरी त्यांच्याकडून…
दुसरीकडे……… “मुंबई पोलिस”, अक्षरश: स्वत:च्या घरची माणसे दर्शनाला आल्यासारखी झटत होती, प्रत्येकाला दर्शन मिळावे पण त्यामुळे होणार्या गर्दीमध्ये काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी त्यांच्या प्रयत्नांची पराकाष्ठा चालु होती. सगळ्यांना सांभाळून घेत, कोणावरही न खेकसता (वाचकांनी ओरडणे आणि खेकसणे यातला फरक लक्षात घ्यावा) लोकांची दर्शनाची इच्छा पुर्ण करण्याचा त्यांचा प्रयत्न चालु होता…. माणसे आणि गाड्या दोघांची गर्दी झालेली, कोणीही एकमेकांना जुमानत नव्हते…. दिसतेय कि जाण्यासाठी समोर रस्ता नाही आहे, तरीपण ज्याला-त्याल्या आपली गाडी पुढे दामटावयाची होती. एका ट्रॉफिक पोलिसाला तर मी चक्क हात जोडून विनंती करताना पहिले…. तरीपण जसा तो दुसर्याला थांबवण्यासाठी वळला तेव्हा पहिल्याने गाडी पुढी नेवून झालेल्या ट्रॅफिक जाम मध्ये आपल्यापरीने थोडाबहुत हातभार लावलाच.
प्रसंग दुसरा…………….. (काही जणांच्या भावना दुखावतील, पण नाईलाज आहे)
गणेशोत्सवापुर्वी काहि दिवस अगोदर, जेव्हा लाऊडस्पिकर्सच्या बंदीबाबत वाद सुरु होता त्यावेळी संस्कृतीरक्षकांनी (???) घोषणा केली कि, कोणी काहीही म्हणोत पण आम्ही “गणेशोत्सव दणक्यातच साजरा करणारच”. त्यावेळी मी स्वत: याला जोरदार समर्थन दिले होते. काहीही झाले तरी हा आपला सण आहे, तो दणक्यातच साजरा झाला पाहिजे. पण कालचा प्रसंग बघितला आणि खरोखर मन विषण्ण झाले, असं वाटले का? का आपण याचे समर्थन केले…
रात्री २ वाजताच्या सुमारास, जेव्हा आम्ही परतीच्या प्रवासास निघालो त्यावेळेस जवळपास सर्वच भक्त जे दर्शनाला आलेले ते परतीच्या वाटेवर होते, गर्दीतून चालताना कसरत करावी लागत होती. तसेच वरिल प्रसंगात सांगितल्याप्रंमाणे, ट्रॅफिक जाम होते… त्याचे नियोजन करता करता पोलिस अक्षरश: दमून गेलेले…. त्याचवेळी, संस्कृतीरक्षकांनी (???) डिजे लावला आणि यांचे आणि त्याच बरोबर आसपासच्या मंडळाचे कार्यकर्ते त्या डिजेच्या तालावर विक्षिप्त हावभाव करत नाचत होते. आणि ते पण मुख्य रस्त्यावरच (चिंचपोकळी कडून दादरच्या दिशेने)…… डिजे सुरु झाल्यावर जे उरले सुरले होते ते नियोजन सुद्धा कोलमडून गेले…. पोलिसांना सपशेल हतबल झालेले बघितले… काय करणार ते बिचारे, कुणाला बोलायची सोय राहिली नव्हती.
हे वरिल दोन प्रसंग तर मी एका दिवसात नव्हे फक्त ५ ते ६ तासात अनुभवले आहेत, अनेकांनी असे अनुभव अनुभवले असतील…
पण खरचं हे गणेशोत्सवाचे स्वरुप पाहता मला तर टिळकांचा अतिशय राग येतोय, राहुन राहुन एक प्रश्न त्यांना विचारावासा वाटतोय. टिळक, का ? का त्या बिच्चार्या गणरायाचे असे हाल केलेत तुम्ही? तो बिच्चारा चांगला देव्हार्यात शांतपणे बसुन होता. भक्तांची गार्हाणी ऐकत होता, त्यांच्या दु:खांना हलके करत होता. तुम्ही तर त्याला देव्हार्यातुन चौकात आणुन त्याला पार हतबल करुन टाकलेत हो….. भक्तांच्या दु:खाचे निवारण करनारा तो दु:खहर्ता, आता त्याच्या दु:खाचे निवारण कोण करणार ? त्याच्या माथ्यावर मंडळाच्या नावाचे शिक्के मारुन त्याला स्वत:शीच स्पर्धा करण्यास भाग पाडलेत. आज तो गणराय स्वत:च गोंधळून गेलाय, त्याला स्वत:लाच त्याचे अस्तित्वाशी झगडावे लागतेय.
मला खरं सांगा टिळक, कुणी दिला होता हो तुम्हाला हा अधिकार ? खरचं टिळक चुकलात तुम्ही… नक्किच चुकलात….
इंग्रजाना बरोबर ओळखलेत हो तुम्ही की, ते धार्मिक सण साजरे करण्यापासून तुम्हाला रोखु शकणार नाहीत….. पण त्याचवेळी तुम्ही आपल्या स्वत:च्याच माणसांना ओळखण्यास चुकलात. त्यांना गणेशोत्सव साजरा करण्यास तर सांगितलेत, पण त्याच बरोबर तो साजरा करण्याबाबतचा हेतू आणि तो कसा साजरा करावा याच जरा तरी ज्ञान दिलं असतं तर बरं झाले असते हो.