अजुनही

कवी : कुसुमाग्रज


निळ्या जांभळ्या नदीला
आंबेवनाची सावली
भेट पहिलीवहिली
अकल्पिता ।

… भेट दूरस्थपणाची
गर्भरेशमी क्षणाची
सौदामिनीच्या बाणांची
देवघव ।

गुलबक्षीच्या फुलांनी
गजबजले कुंपणे
वेचू लागला श्रावण
मोरपिसे ।

ओल्या आभाळाच्या खाली
इद्रचापांचे तुकडे
तुझा करपाश पडे
जीवनास ।

कधी रेताडीचे रस्ते
कधी मोहरली बाग
कधी प्रासादास आग
कर्पुराच्या ।

सप्तसुरातुनी गेले
माझ्या जीवनाचे गीत
तुझ्या सारंगीची तात
साथ झाली ।

बर्फवाट शिशिराची
आता पुढलिया देशी
तुझ्या मिठीची असोशी
अजूनही ।

Leave a Comment