एकाच उत्कट क्षणात
वेलीवर सर्वस्व पणाला लावून उमललेलं
अतिमधुर वासाचं कोवळं फुल
वाळून, गळून जाण्यातली सहजता कुठुन येते जगण्यात?
उपचार, आधार, सांत्वन, दिलासा
यांच्या पलिकडचे काही देणारे कसे येतात हातात हात?
भोवती आरोळ्या ठोकतात, हिंस्र्व होतात
किंवा हताशपणे मोडत जातात ती आपलीच माणसं असतात
या समजुतीचा घोट कसा उतरतो गळ्यातून आत?
सोपवता कशी येतात सगळी वेल्हाळ स्वप्नं
कुठल्यातरी तक्रारीविना काळाच्या निर्मम हातात
आणि कसा फुलून येतो तरी सार्या जन्माचा चेहरा
प्रेमाच्या एकाच उत्कट क्षणात?