किलबिललेले उजाडताना
ओठ उगवतीचा थरथरला
गुलाबलेला ओललालसर
तुडुंबलेले
संथ निळेपण
पसरत गेले चार दिशांना
तांबुसवेडे
हळुहळु मग नि:स्तब्धातुन
स्वप्ने उडली गुलाल घेऊन
लालचुटकश्या चोचीमध्ये
पिंजर-पंखी,
आणिक नंतर
आपखुशीने अभ्र वितळले
उरले केशर
आणि भराभर
उधळण झाली आकाशावर
आकारांची
रंगदंगल्या
नाहि उमगले
केव्हा सरला रजतराग हा
ही अस्ताई,
आणि उमटला रौप्यतरणा
झगमगणार्या जलद लयीतील
… असा विसरलो, बिसावलो अन्
नीरवतेच्या गुप्त समेवर
आणिक नंतर
न कळे कैसी
मनात माझ्या –
काहि न करता –
जाणिव भरली कृतार्थाची