आयुष्याच्या त्या वळणावर पुन्हा ती भेटली,
आठवण तिची पुन्हा हृदयात दाटली,
प्रीतीची बाग पुन्हा एकदा बहरली,
बघताच तिला मी स्तब्ध जाहलो,
‘छान दिसते आजही तितकीच’ मनात उद्गारलो,
‘पण…. ओळखलं असेल ना तिने?’ स्वतःशीच म्हणालो,
विचारांचा जणू कल्लोळच माजला,
तिने, ‘Hi’ म्हणताच, जीव स्थिरावला,
ओळख आहे तिलाही कळल्यावर, चेहरा आनंदला,
गावं का गाणं एखादं तिच्यासाठी!
का मारावी तिला एक घट्ट मिठी,
आनंदाच्या लहरीत,
पुन्हा आठवल्या त्या जुन्या भेटी,
लागली बोलायला अन् मी भानावर आलो,
विचारपूस तिची मग मीही करू लागलो,
खरंतर, तिचे बोलणे ऐकण्यातच मी पुन्हा गुंगून गेलो.
सोबतीत तिच्या, वेळ कसा छान निघून गेला,
पुन्हा पुन्हा भेट होत रहावी, असे वाटू लागले मला,
मनात आलं,
‘चल, तुला घरी सोडतो’, असे विचारावे का तिला?
‘सोडतोस ना मला घरी?’, अनाहूत ती उद्गारली,
आश्चर्य आणि आनंदाने, मनाने गिरकी घेतली,
असावी तिची साथ आता कायम, अशी इच्छा मनी दाटली.
आयुष्यात ती पुन्हा भेटली…आणि आता कायमसाठी…